पुनर्जीवित शालेय जीवन


परिस्थितीशी झुंज देत देत मी ही थकलो. शेवटी कंटाळून मडगाव न्यू मार्केट मध्ये प्रभाकर घोडगे ह्यांच्या जनरल स्टोअर वर नोकरी धरली. धीर सोडला नाही. अनेक माध्यमातून प्रयत्न जारी ठेवले. नविन पुस्तके विकत घेतली आणि गाड्यावर मधल्या वेळी बसलेलो असताना कोणी शिकलेला माणूस अथवा विद्यार्थी दिसला की त्यांच्या कडून मदत घ्यायची आणि इंग्रजीचे ज्ञान वाढवत रहायचो.

यावेळी मला देवदूतासारखा धावून आला तो कै. अॅड. दिलीप सावर्डेकर.. तो कायद्याचा विद्यार्थी होता. बेळगाव येथे कायदा कॉलेजमध्ये शिकत होता. घरी असताना अभ्यास करून कंटाळा आला की, वेळ घालवण्यासाठी तो मोकळ्या वेळी गाड्यावर येऊन बसत असे. त्याने माझा शिक्षणाचा ध्यास आणि त्यासंबंधीची अस्वस्थता ओळखली. त्याने मला स्कूल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी मदत करण्यासाठी वचन तर दिलेच, त्या व्यतिरीक्त बंधूराज शंभू यांना राजी करण्याचीही जबाबदारी घेतली.

त्याने कित्येक दिवसच नव्हे तर महिन्यांचे महिने भावाची पाठ सोडली नाही. त्या अगोदर त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याच्या वैयक्तीक अडचणी सोडवल्या. त्याला व्यवहारासंबधीही मदत केली. अशा तऱ्हेने शेवटी त्याने शंभूला राजी केले.

त्याचा होकार गृहीत धरून दिलीप पुढील कामाला लागला होताच. दिलीपचा मोठा भाऊ मडगावच्या मॉडेल हायस्कूल मध्ये गणिताचा शिक्षक होता. सदर हायस्कूल मध्ये त्यांना बरेच वजन होते. शैक्षणिक नियमानुसार जर का शिकणे अखंड पणे चालू असते तर ज्या शैक्षणीक वर्षात प्रवेश घेऊ बघतो त्या वर्षी ज्या इयतेत असता त्या इयत्तेत बसू शकतो. अट अशी की त्या मागच्या इयत्तेची परीक्षा द्यायला पाहिजे आणि यशस्वीपणे पास केली पाहिजे. सदर तरतूदीनुसार १९६८ च्या शैक्षणिक वर्षी आठवी मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.

दैव माझी पाठ सोडत नव्हते आणि मी हार मानायला तयार नव्हतो. तरी ही आलेली निराशा दिलीपच्या जिद्दीमुळे आम्हाला रोखू शकली नाही. त्यांनी कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक उचापती केल्या आणि शेवटी दीप स्तंभ दृष्टीक्षेपात आला. तो दीप स्तंभ म्हणजेच खी. ओलोमपियो डायस गवर्नमेंट मल्टीपरपॉज हाय स्कूल जुने मार्केट याचे त्यावेळचे मुख्याद्यापक. त्यांना दिलीपने सविस्तर आणि खरी सगळी हकीकत सांगितली आणि मदतीची विनवणी केली. सर माझ्याशी सविस्तर बोलले आणि परिस्थीती जाणून घेण्यासाठी लहानपणापासूनच्या बाबी विचारून घेतल्या. माझी तिव्रता, जिद्द आणि शिकण्यासाठी कसलेही कष्ट घेण्याची तयारी आजमावली. जेव्हा त्यांना त्यांच्या प्रयोगासाठी योग्य असे मटेरीयल (रसायन) वाटले तेव्हाच त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष परिक्षा द्यायला बोलावले. सदर तरतूदीनुसार आठवीसाठी सातवीची परिक्षा पास करणे अत्यावश्यक असते. नाहीतर आठवीला बसू शकणार नाही ते लक्षात घेऊन मी सरांना सांगून टाकले की सातवीची परीक्षा पास होण्याची माझी क्षमता नाही मला केवळ अवघेच शब्द येतात. कॅट, मॅट, रॅट, कम, गो अशा प्रकारचे पन्नास साठ शब्द असतील. वाक्य रचनाही मला जमत नाही. त्या बरोबर सर हसले आणि म्हणाले, सगळी मदत मिळेल. काळजी करू नकोस.

तीन पेपर्स लिहायचे होते. इंग्लीश, जनरल सायन्स आणि गणित. त्यानुसार मला वाटते पहिला जनरल सायन्स चा पेपर दिला. तो हातात धरून मी बघतच राहिलो. मला सटसटून घाम सुटला. त्याचे उत्तर लिहिणे दूरची बात मला काय विचारले आहे, तेच कळेना. सर जवळ येताच त्यांना माझी अवस्था आणि असमर्थता बोलून दाखवली. तेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ते सांगू लागले आणि मला लिहायला सांगितले. ते ही मला जमेना. पूर्व तयारी म्हणून दोन- तीन महिनेच इंग्लीश शिकलो आणि वर सांगितल्या प्रमाणे केवळ पन्नास- साठ शब्द शिकलो म्हणून सातवीचा पेपर लिहिणे कसे शक्य आहे? शेवटी लिहून दिलेली उत्तरे सुद्धा लिहून काढता आली नाहीत. वाक्य लिहायला कशी सुरुवात करतात तेच मला माहित नव्हते. वाक्याची सुरूवात करताना पहिला शब्द कॅपीटल काढायचा हे माझ्या ध्यानात होते. परंतु नकळत वाक्याच्या मधेच कॅपीटल शब्द काढत असे, तर बऱ्याचदा बाक्याच्या मधेच एखादा शब्दच गाळत होतो.

निरूपाय म्हणून मला लिहिलेली उत्तरे मिळाली. ती ही लिहिता येईना. त्यावेळी सरांनी कपाळावर हात मारला आणि पाच मिनीटे स्तब्ध राहिले. थोडेसे चिंतीत दिसले. शेवटी माझा हात धरून स्वतःच तिन्ही पेपर्स पास होण्यासाठी अत्यावश्यक तेवढेच लिहिले. मला वाटले भंगले आता माझे स्वप्न. मी अतिशय केवीलवाण्या मुद्रेने त्यांच्याकडे पहातच राहिलो. माझी अवस्था बघून सर हसले आणि म्हणाले उद्या ये आणि आठवीच्या वर्गात बस. माझा विश्वासच बसेना. मी खरोखर असेच ऐकले का? मी सरांकडे पाहत राहिल्याने त्यांना त्याचा अर्थ कळला. ते म्हणाले पेपर्स फाईली मध्येच राहणार तू पास झाला असे समज आणि उद्या सांगितल्या प्रमाणे अठवीच्या वर्गात येऊन बस..

मला दुसऱ्या दिवशी आठवीच्या वर्गात बसायला सांगितल्याची खात्री झाल्यावर माझा आनंद गगनात मावेना. हवेत तरंगत बाहेर आलो. तर दत्त म्हणून अपेक्षेप्रमाणे दिलीप सावर्डेकर दारात उभा. जे काही आत घडले ते त्याला सविस्तर पणे सांगितले. ते ऐकतांच आपल्या अथक प्रयत्नांना यश आल्याचे समाधान त्याच्या चेहयावर स्पष्ट दिसत होते. तो नसता तर! मला विचार करून घाम सुटला. सरांनी केवळ शिक्षणाप्रती माझा ध्यास आणि अंतरिक तळमळ जाणून एवढी मोठी जोखीम घेण्याचे धाडस केले. त्याला तोड तर नाहीच. त्यांच्याचमुळे मला पुनश्च शिक्षणाचे द्वार खुले झाले.

दसऱ्या दिवशी सांगितल्या प्रमाणे आठवीच्या वर्गात येऊन बसलो. वर्गातील सगळे विद्यार्थी आश्चर्याने माझ्याकडे बघतच राहिले. एवढ्या उशिरा हा प्राणी! स्कूल सुरू होऊन आठवडा झाला आणि हा आज आला. एवढ्यात डायस सर आले. तो वर्ग एलीमन्ट्री कॉर्मस चा होता. त्यांचा नव्हे. वर्ग शिक्षक मिनेझिस होते. त्यांच्या कानात हळूच काय तरी सांगितले आणि मला पाठीमागे न बसता पुढे येऊन बसण्याची सूचना केली आणि ते निघून गेले.

आता माझा आयुष्याचा वेगळा प्रवास सुरू होत होता. वरील वर्ग शिक्षकाचा टोन पोर्तुगीज होता त्यामुळे ते काय बोलतात हे मला समजत नव्हते. त्याने मला उभा राहण्यास सांगितले. परंतु मला वाटले त्यांच्या टेबलाकडे ये असे म्हटल्याचे त्याप्रमाणे टेबलाकडे चालल्याचे बघून सरांनी काय तरी म्हटले ते ही मला कळले नाही. त्या बरोबर सगळा वर्ग खदखदा हसला. मी एकदम नवस झालो. अशाप्रकारे स्कूल मधील माझा पहिला दिवस संपन्न झाला.

दसऱ्या दिवशी वर्गात प्रवेश करताच माझ्या अगोदर वर्गात आलेली मुळे मोठ मोठ्याने माझ्याकडे बघून हसायला लागली. शारिरिक लठ्ठपणा बघून कोण मला 'बटाट' म्हणाला तर दूसरा कोणतरी आणखी काय तरी. मी ठरवून आणि हेतूपुरस्सर अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष केले. मी वयाने त्यांच्यापेक्षा मीठा आणि जीवनातील वेगवेगळ्या वळणातील मार्गावरून प्रवास करीत इथपर्यंत पोचलो. त्यामुळे मनाची पूर्ण तयारी होती. मन म्हणाले हे आव्हान स्विकारण्यातच तुझी खरी सत्व परीक्षा आहे. ते तू स्वीकार पण सरांकडे वगैरे तक्रार करू नको.

मी ठामपणे ठरवले की असली आव्हाने लिलया स्विकारायची आणि त्यांना शिकण्यात प्रगती दाखवून सकारात्मक पद्धतीने उत्तर द्यायचे. ठरले! त्या क्षणापासून मी एकही मिनीट वाया घालवले नाही. स्कूलमधून घरी येताच घाईने जेवण करून भावाला जेवण आणि विश्रांती साठी सोडायला गाड्यावर जावे लागे. तो त्याच्या सोई प्रमाणे गाड्यावर परत आला रे आला की पुस्तके आणि वह्या घेऊन मी खारेबाद- पेड येशील नदिकिनारी बांधावर अभ्यासाला जात असे. काळोख पडेपर्यंत तेथेच अभ्यास करून नंतर परत गाडा. गाडा बंद करायला रात्रीचे अकरा बारा ही वेळ नित्याचीच होती. तो सगळा परिसर वेश्यांचा होता. त्यामुळे सभोवती रात्रभर हालचाली असायच्या. हे नित्याचे असल्याने अंगवळणी पडले होते. त्याचा मनावर कसलाच परिणाम होत नव्हता.

घरी परतल्यावर पांच-दहा मिनीटांत जेवण आटोपून मांगरात अभ्यासाला बसत होतो. दैनंदिन मी पहाटे तीन पर्वत अभ्यास करत असे. त्याशिवाय तरणोपाय नव्हता कारण प्रत्येक विषय हा मला नवीन आणि आव्हानात्मक तर होताच पण त्याच बरोबर जवळ पास सगळेच शब्द मला नवीन होते. त्यामुळे इंग्लीश-मराठी शब्द कोष घेऊन मी त्या-त्या पुस्तकातच प्रत्येक शब्द मराठीत लिहून काढीत असे. त्यानंतरच वाक्याचा अर्थ समजून अभ्यास करत असे. मला असे करणे क्रमप्राप्त होते कारण माझ्या शब्द भांडारात अवघेच शब्द होते. ते जवळ-जवळ रिकामेच होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यामुळे प्रत्येक पुस्तक मराठी अर्थाने भरून गेले होते. अशा मुळे त्या वर्षी मी कोणताच सण साजरा केला नाही. नाटक ही माझी कमजोरी, त्यामुळे व्यावसायीक कंपनीचे प्रत्येक नाटक बघत असे, ते मी विसरलो. याप्रमाणे सगळ्या छंदांना आणि उत्सवांना मी तिलांजली दिली. त्या वर्षी गावी, म्हणजेच आडपईला चतुर्थीला सुद्धा गेलो नाही. “एक वेळ नोकरी सोडू पण चतुर्थी नाही" असे आडपईकरांचे ब्रिद वाक्य तेही मी पूर्णपणे विसरून गेलो. थोडक्यात सांगायचे म्हणजे मला लॉक डाऊन करून टाकले. त्या काळी पिंपळ कट्ट्यावरील सार्वजनिक गणपती खारेबांध येथे नदीत विसर्जीत करीत होते.

मडगावचे रहिवासी म्हणजेच दामू बाबांच्या आसऱ्याखाली राहणारा प्रत्येक नागरिक विसर्जनाचा कार्यक्रम अनुभवत होता. कोणच तो कार्यक्रम चुकवत नसे. तो आमच्या वस्ती समोरून पहाटे तीनच्या दरम्यान जाताना सुद्धा उठून गेलो नाही. पण अभ्यास करताना तेथूनच नमस्कार केला. हृदयातून केलेला नमस्कार कोठूनही करू देवाला पोहचतो. थोडक्यात ती एक-दोन वर्षे एकाच कारणाला वाहिलेली ते म्हणजे अभ्यास एके अभ्यास त्याचे फळही मला मिळाले.

आठवी इयत्ता माझ्यासाठी पुढील आयुष्याचे महाद्वार होते. ते उघडले की पुढचे सगळे आवाक्यातले. पहिल्या तीमाही परिक्षेत इंग्रजीत १७ गुण सर्वसाधारण विज्ञान २२ गुण, अशा प्रकारे १० पैकी ८ पेपर्सना मिळाले. आणि राहिलेल्या दोन पेपर्स म्हणजे मराठी आणि हिंदी मध्ये मी पास झालो. प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर निकाल पाहून सर खुश झाले. अभ्यासाची चौकशी केली आणि तसेच झोकून देण्याचा सल्ला दिला.

त्याच्या पुढील सहा महिन्याच्या परिक्षेत अजून दोन विषयांत सर्वसाधारण विज्ञान आणि गणितात पास झालो. सरांचे माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे हे माहीत होते. पुढील नऊमाही परिक्षेत मी दहा पैकी ७ पेपर्स मध्ये पास झालो. हे माझे वाढते यश पाहून सर खूश तर होतेच त्याच बरोबर त्यांना पुढील वर्गात प्रोमोट केलेला नव्हे तर निःसंशय पणे पास झालेला पाहिजे होते. माझ्या पुढे हे आव्हान तर होतेच. त्याच बरोबर माझी चेष्टा करणाऱ्यांना सरांच्या उपदेशा प्रमाणे सकारात्मक उत्तर द्यायचे होते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना त्या उक्तीप्रमाणे मला अपेक्षे पेक्षा मोठे यश मिळाले. मी सगळ्या विषयांत चांगल्या पैकी गुण मिळवून आठवीत तिसरा क्रमांक मिळवला होता. हे यश पाहून माझ्यापेक्षा सरांना जास्त आनंद झाला. त्यांनी ऐकताच सुरेका म्हणून आर्कमिडीजच्या पद्धतीने उंच उडी मारली. मला उचलून नाचले आणि सगळ्या समार अत्यानंद व्यक्त केला.

यशाचे दावेदार खूप असतात पण अपयश पोरके असते. या यशामध्ये माझ्या एवढेच सरांचेही योगदान होते. सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थीतीतही त्यांनी जो विश्वास दाखवला ते मोठे विलक्षण नव्हे तर मोठी जोखीम व धाडस होते. यांत दुर्दैवाने मला अपयश आले असते तर त्यांच्या सहकाऱ्यांकडूनच नव्हे तर शिक्षणखात्याकडूनही त्यांची अवहेलना झाली असती. त्या मुळे याही गोष्टीचा माझ्यावर दाब होता..

पुढे जे वर्ग बंधू माझी अवहेलना आणि माकड चेष्टा करीत होते त्यांच्यात आता नववीच्या वर्गात माझ्या बाजूला बसण्याची स्पर्धा लागली. असो. माझा सगळ्यात आवडता विषय जनरल सायन्स आणि तो विषय चांगल्या प्रकारे शिकवत होते स्वतः सर. एकदा जनरल सायन्स मधील प्रेशर पंप सबंधी शिकवताना सरांनी डायग्राम मध्ये वाल्व्ह उलटा काढला. ते माझ्या लक्षात आले. वाटले वेळीच सरांच्या लक्षात ती चूक आणून दिली तर त्यांना बरे वाटेल कारण त्यांनी तो चुकून काढला. म्हणून मी उठलो आणि सरांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली. त्या बरोबर ते माझ्यावर प्रचंड संतापले व भर वर्गात माझी कानउघाडणी केली व म्हणाले एक वेळ तुला व्यवस्थित वाक्य रचता येत नव्हते वाक्याच्या मध्ये कॅपीटल शब्द काढत होतास तूं आतां माझ्या चुका दाखवायला धजलास ही तुझी हिंमत! असे म्हणून मधेच क्लास रूम सोडून निघून गेले.

मी एकदम नवस झालो आणि अंगात थरथर आला. सर असे कां बागले? कदाचीत मी त्यांचा मान राखून बोललो नसेन कारण तेव्हा माझी बोलण्याची इंग्रजी काम चलावू होती. काही वेळाने ऑफिस प्यून आला आणि मला सरांनी बोलावल्याचे सांगितले. भयभीत होऊन थरथर कापत त्यांच्या केबीन मध्ये चोर पावलांनी प्रवेश केला. त्यांची नजर पडतांच ढळाढळा रडलो आणि रडक्या आवाजातच झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यांनी माझे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले "माफी तू का मागतोस? तू बरोबर होतास. वर्गातील माझे वागणे गैर होते. म्हणून माफी मी तुझी मागतो.'

माझ्या आयुष्यात अशा प्रकारची महान व्यक्ती आली, हे मी माझे भाग्यतर समजतोच शिवाय ती माझी पूर्व जन्माची पुण्याई असली पाहिजे. ते तापट तर होतेच पण शिघ्रकोपी होते. त्याचक्षणी प्रतिक्रिया त्यांच्या कडून होत होती. खोटेपणा आणि ढोंगीपणाची तर त्यांना चीड येत होती. त्यांच्या जवळ गेलात तरच ते ओळखता येत होते. त्यांचे वास्तविक आयुष्य आणि अंतरमन हे समाजापुढे बायला पाहिजे होते. कारण त्या मधून शिकण्यासारखे खुप होते. त्यांची पूर्ण ओळख करायची म्हटल्यास एक वेगळे आणि स्वतंत्रच पुस्तक लिहावे लागेल. तरी पण त्यांच्या सबंधीचे काही प्रसंग लिहीण्याचा मला मोह आवरत नाही.

सदर घटनेनंतर त्यांनी मला एक अतिशय महत्वाची घटना सांगितली ती अशी.

पोर्तुगीज काळातील ती घटना, त्यावेळी सर पोर्तुगीज माध्यमातून बाच स्कूल मध्ये शिकवत होते. त्या वेळी या स्कूलचे नाव 'इस्कोल दा कोमसबल' असे होते.

एकदा सर वर्गात भूगोलाचा महत्वाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकावा असा भाग शिकवताना एक विद्यार्थी टिवल्याबावल्या करताना त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी त्या विद्यार्थ्याला उचलेले आणि एका मजल्यावरील खिडकीतून बाहेर फेकले. तो विद्यार्थी जबर जखमी झाला. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. जखम बरी झाल्यावर तो विद्यार्थी परत वर्गात येऊ लागला. सामंजस्याने ते प्रकरण ही मिटले. समाजात आणि प्रशासनात एक निष्ठावंत आणि प्रामाणिक शिक्षक अशी सरांची ख्याती होती. त्यानंतर त्या वर्षाची वार्षिक परिक्षा झाली. त्या विद्यार्थ्याला भुगोलात सर्वात जास्त गुण मिळालेले बघून सरांना आश्चर्य वाटले. कारण त्या विषयात तो सर्वात अशक्त तर होताच शिवाय पासही होत नव्हता.

सरांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले आणि कधी नव्हे तर सर्वात जास्त गुण मिळण्याचे कारण विचारले. त्याने दिलेले उत्तर पाहून सर चाटच झाले. त्या विद्याथ्र्याने सांगितले की सर त्याच्यावर नाराज असल्याने ते त्याला भुगोल विषयात नापास करतील आणि त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाईल म्हणून भुगोल हा विषय विशेष कष्ट घेऊन शिकला.

कोणाचा बदला घेणं हे त्यांच्या शब्दकोषातच नव्हते. त्यांचे तरी पण एक होते जर बदला घ्यावाच लागला तर कसा सकारात्मक पद्धतीने घ्यावा ते त्यांनी सांगितले. ते नावेली येथे कुटूंबासह राहत होते. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला त्या वेळच्या युनायटेड गोवन्स पक्षाचे आमदार इल मिरांडा त्यांच्या कुटूंबासह राहत होत्या. तिला घमेंड फार. काहीतरी कारणे काढून ती त्यांना सतावत होती. तक्रार केली तरी आमदार असल्याने त्यातून सहीसलामात पणे निसटायची. तिने सरांचे आणि कुटुबीयांचे जगणे नको करून ठेवले होते. ते पोर्तुगीज शिक्षक होते. आता त्या वरून त्यांना हिणवायचे. पोर्तुगीज गेले, आता तुम्ही जा पोर्तुगालला. का मागे राहिलास ? सरांनी तिचा योग्य पद्धतीने बदला घेण्याचा वज्र निर्धार केला. सरांनी इंग्रजी मधून बी. ए. केली त्यानंतर एम. ए. केली. पोर्तुगीजच्या राजवटीला विरोध करीत पिंटो यांनी सालसेतच्या भागामध्ये बंड केले होते. त्या पिंटोच्या क्रांतीचा विषय घेऊन सर पी. एच. डी. करीत होते. मोठ्या मुलाला इंजिनीयर केला. तो अमेरीकेला असतो. दुसरा चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन स्पेशलीस्ट डॉक्टर झाला.

त्या उलट मिरांडाचा एक मुलगा कोयर ग्रूप मध्ये वाजवतो तर दुसरा असा बेकार हिंडतो. ती ही आता आमदार राहिली नव्हती. तिचा तोराही उतरला होता. तिला गाठून तिला कशा पद्धतीने सरांनी तिचा बदला घेतला ते सांगितले. ही त्याबदल्याची सकारात्मक बाजू. सरांनी रामायण आणि महाभारताचा सखोल अभ्यास केला. आमच्या गावांत, आडपईला श्रावणात रामकृष्ण नाईक, गुरु चरित्र, रामायण, महाभारत वगैरे वाचत असे आणि त्याची सविस्तर कथा अथासकट सांगत असे. त्याच्या कडून अशा प्रकारे संपूर्ण रामायण आणि महाभारत आम्ही शिकलो होतो. परंतु त्यातील बारकावे आणि समाजाला मिळणारा संदेश सरांनी मला सांगितला. पुढे त्यांनी असेही सांगितले की, सदर ग्रंथ पूर्णपणे वाचले आणि समजून घेतले तर माणसाचे आयुष्य समृद्ध होते.

प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वाद, तंटे आणि भेद असतातच. अशाच पद्धतीचा वाद गवर्नमेन्ट मल्टीपरपॉज हायस्कूल मध्ये उपाध्याय नामक इंग्रजी शिकवणारे शिक्षक दमणहून येथे बदलीवर आल्यावर झाला. मूळ वादाचा वास्तविक मुद्दा आजही मला माहित नाही. सगळे बाकीचे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या विरोधात गेले. आम्हाला कारण कोणीच सांगितले नाही. त्यावेळी मी १० वीच्या वर्गात शिकत होतो. सदर शिक्षक इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकवत होते. मला ते फार आवडत होते.

एक दिवस सगळे शिक्षक बगांवर बहिष्कार घालून स्कूल समोरील मैदानावर धरणे धरून बसले. त्यांनी विद्यार्थ्यानाही फितवले आणि तेही त्यांच्या सोबत धरण्याला बसले. त्या शिक्षकाचा, उपाध्यायांचा पहिला लेसन १० वीच्या वर्गात होता. त्याप्रमाणे ते वर्गात आले आणि मला एकट्याला बसलेला पाहून आश्चर्यचकीत झाले. त्यांनी विचारले "सगळे शिक्षक आणि विद्यार्थी माझ्या विरोधात मैदानावर धरणे धरून बसलेत तूं नाही गेलास ?" मी म्हटले. "नाही" त्यांनी विचारले सगळ्यांचा विरोध पत्करून तू येथे एकटाच बसलास तुला भय वाटत नाही?" मी म्हटले "नाही" मी पुढे सांगितले आम्हाला कोणीही सविस्तर वादाचा मुद्दा सांगितला नाही. आणि आमचे मत ही विचारले नाही. ही लोकशाही आहे. विद्यार्थी असलो म्हणून काय झाले. आम्हाला आमचे स्वतःचे मत आहे.

सदर शिक्षकाने वादाचा मुद्दा सांगितला ते ऐकून मी माझा निर्णय त्या शिक्षकाला सांगितला. “मी शिकणार आहे. तुम्ही शिकवा.” त्यांनी शिकवणी सुरू केल्यावर कित्येक जण त्यात विद्यार्थी नेते, शिक्षक वगैरे वर्गाबाहेरून वर्गावर बहिष्कार घालून बाहेर येण्यासाठी खुणावत होते. मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. माझा तोरा आणि निर्धार बघून काही वेळाने दोन-तीन जण हिंदू विद्यार्थी आत वर्गात आले आणि माझ्या बाजूला बसले. त्यावेळी सदर स्कूलमध्ये हिंदू विद्यार्थी फारच किरकोळ होते. १० वीच्या वर्गात तर माझ्या व्यतीरिक्त तीनजणच होते. बाकीचं सगळे ख्रिश्चनच होते.

त्या नंतर स्कूलची वेळ संपताच स्कूल सुटल्याची लाँग बेल झाली. मी माझी सायकल स्कूलच्या मुख्य प्रवेश द्वारात ठेवली होती. ती न्यायला आलो आणि तिची अवस्था बघून धक्काच बसला. तिची पूर्णपणे मोडतोड केल्याचे दिसले. दोन्ही चाकांची हवा सोडून पंक्चरही केली होती. सगळ्या विद्यार्थ्यांनी मला घेरले होते. शांतपण सगळं आसूरी मजा लुटत होते. पण ती बुद्धा पूर्वीची शांतता हे मला कळत होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने मी त्यांच्या विरोधात गेलो एवढेच नाही तर विद्यार्थ्यामधील ऐक्य भंगले. त्यामुळे शिक्षा ही मला मिळणारच हे मी जाणले होते. मी एक चक्कार शब्द न काढता ती मोडकी सायकल उचलायला पुढे आलो. तेवढ्यात एक विद्यार्थ्यांचा गट माझ्यावर तुटून पडला. माझ्यावर उभारलेले हात कोणी तरी वरच्यावर अडवले याची मला जाणीव झाली. पाहतो तर ते स्वतः सर हेडमास्तर, ऑलोपीय डायस होते. ते त्यांच्यावर ओरडले आणि मोठ्याने म्हणाले, "कोणीही आडपईकराला हात लावणार नाही. त्याला जाऊ द्यावे. ही लोकशाही आहे आणि तो त्यामधील एक घटक आहे. त्याला स्वतःचे मत आहे. त्याच्या मतानुसार त्याला वागू द्या.' हा मला सरांचा टोमणा होता. दुसऱ्या दिवशी मला कळले वर्गावर बहिष्कार घालण्याची ही सगळी योजना स्वतः मुख्याद्यापक ऑलोपीयो डायस ह्यांचीच होती. ते सर ज्यांनी मला बंद आणि उघडणे अशक्य असलेले शिक्षणाचे द्वार उघडले होते. ज्यांनी मला घडवले होते. त्या वेळी मी जो कोण आहे तो केवळ त्यांच्याच मुळे. तरीही त्या आंदोलनाच्या विरोधात एकटाच उभा राहिला आणि तो ही मीच. कोणता महात्मा यावर काहीही कारवाई न करता स्वस्थ बसला असता?

पुढे संधी मिळताच सर मला एवढेच म्हणाले. "मी तुम्हाला सर्वसाधारण विज्ञानाबरोबर नागरिक शास्त्र ही शिकवतो. ते नागरिकशास्त्र तुला एकट्यालाच कळले” त्याच्या नंतर सरांनी त्या अप्रिय घटनेचा चुकून सुद्धा उल्लेख केला नाही.

आमच्या स्कूलमध्ये एकूण विस एक हिंद विद्यार्थी होते. बाकीचे सगळे ख्रिश्चन होते. त्यामुळे असेल अथवा चालत आलेल्या प्रथेमुळे असेल स्कूल मधील सकाळच्या असेंब्लीला ख्रिश्चनांच्या पद्धतीने प्रार्थना होत होती. ते मला कधीच पटले नाही. परंतु ज्या दिव्यातून आणि परिस्थीतीतून त्या स्कूल मध्ये प्रवेश केला आणि शिकत होतो त्यामुळे पटत नसले तरी उघड विरोध करू शकत नव्हतो. सुदैवाने लवकरच मला सुवर्ण संधी मिळाली.

ह्याच माझ्या १०वीच्या वर्षी तो पर्यंत चालत आलेल्या प्रथेनुसार ११वीची प्रीलीमीनरी परीक्षा संपल्यावर ११वीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद घेण्यासाठी स्कूल समोरील होली स्पीरीट चर्च मध्ये नेले. सोबत आम्हा दहावीच्या विद्यार्थ्यांनाही नेण्यात आले. सदर माससाठी सगळे किरकोळ असलेल्या हिंदू विद्यार्थ्यांसह प्रथे प्रमाणे गुडघा टेकवून प्रार्थनेला बसले. मी तेवढा मागे उभा राहिलो. ते पाहून आणखी दोघे हिंदू विद्यार्थी माझ्या बाजूला उभे राहिले.

हे सगळे चित्र सरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले परत येताना मला त्यांच्या डोळ्यांना डोळा देण्याचे धाडस झाले नाही.

दसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे मी असेंब्ली ला गेलो. जसा ११ वीच्या मासच्या वेळी हॉली स्परीट चर्च मध्ये मागे उभा राहिलो होतो तसाच मागे उभा राहिलो. त्याची सरांनी योग्य नोंद घेतली आणि माईक वरून घोषणा केली की कोणालाही प्रार्थनेच्या वेळी गुडघा टेकवण्याची सक्ती नाही. त्यामुळे कोणालाही मागे उभे रहायचे असल्यास उभे राहू शकतात. प्रत्येकाला आपल्या धर्माच्या प्रथेनुसार वागण्याचा हक्क आहे.

अशा प्रकारे स्कूलचे पहिले वर्ष स्कूल मध्ये टिकण्यासाठी संघर्षात गेले. दसरे वर्ष जम बसवण्यासाठी घालवावे लागले. तिसन्या म्हणजेच इयत्ता १० वीच्या वर्गात असताना बरेच बदल क्रांतीकारक आणि कायम आठवणी ठेवण्यासारखे घडले.

सदर स्कूलमध्ये आता पर्यंत कोणत्याही प्रसंगी तो प्रसंग मग वार्षीक संमेलनाचा असो अथवा इतर कसलाही समारंभ असो. रोमन कोंकानी अथवा इंग्रजी काही वेळा पुर्तुगिज या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे त्या स्कूल सबंधी अपकीर्ती होती की ते ख्रिश्चन धार्जीणे आणि खास करून मराठी द्वेष्टे आहे. या पार्श्वभूमीवर संधी घेऊन मी सरांची मराठी कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली. सर्वांगीण विचार करून सरांनी संमती दिली.

"बर पाहिजे" नावाची मराठी एकांकीका मी लिहिली. १९७० - १९७१ सालातील ही घटना. तो पर्यंत कोकणी मराठी बाद रस्त्यावर येऊन दंगल करण्या इतपत ताणला गेला नव्हता. गोव्याची राज्य भाषाही ठरली नव्हती. मडगाव म्हणजे गोव्याची सांस्कृतिक राजधानी पण सदर स्कूल मध्ये तो पर्यंत मराठी मधून कोणताच कार्यक्रम झाला नव्हता. माझी ती एकांकीका "वर पाहिजे' हिचे सादरीकरण म्हणजेच मराठीमधून त्या स्कूल मध्ये होणारा पहिलाच मराठी कार्यक्रम होता. त्याला कोणीही रोखण्याचा तसा प्रयत्न केला नाही. काहींची नाराजी होती पण सरांपुढे त्यांची डाळ शिजली नाही.

...